Behavioral Economics: How Your Brain Cheats Your Bank Account

Behavioral economics

Misbehaving: The Making of Behavioral Economics ह्या Richard Thaler (नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ) ह्यांच्या पुस्तकाबद्दलचा लेख

Misbehaving: The Making of Behavioral Economics हे पुस्तक पारंपरिक अर्थशास्त्रातील त्रुटी दाखवून देते आणि Behavioral Economics या नव्या शाखेची सुरस कहाणी वाचकांना सांगते.

“Behavioral Economics” हा शब्द 20व्या शतकात प्रचलित झाला. या संकल्पनेला प्रसिद्धी देणारे रिचर्ड थेलर (Richard Thaler) हे अर्थतज्ज्ञ मानले जातात. रिचर्ड एच. थेलर (जन्म: १२ सप्टेंबर १९४५, न्यू जर्सी, अमेरिका) हे अमेरिकन अर्थतज्ज्ञ आणि शिकागो युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूल मधील बिहेविअरल सायन्स व इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आहेत . त्यांना या क्षेत्रातील कामगिरीसाठी 2017 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. याआधी हर्बर्ट सायमन (Herbert Simon- ज्यांनी Bounded Rationality” संकल्पना मांडली), डॅनियल काहनेमन (Daniel Kahneman) आणि अमोस ट्वर्स्की (Amos Tversky) यांनी सुद्धा याच्या पायाभूत संकल्पना मांडल्या होत्या. रिचर्ड थेलर ह्यांनी बिहेविअरल इकॉनॉमिक्सला प्रत्यक्ष व्यवहारात आणले.

Image: Professor Richard H. Thaler, Wikimedia Commons (CC BY 2.0)

Behavioral economics म्हणजे लोकांच्या आर्थिक निर्णयांवर (economic decisions) मानसशास्त्रीय (psychological), सामाजिक (social) आणि भावनिक (emotional ) घटकांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास होय. पारंपरिक अर्थशास्त्रात जसे गृहीतक असते की माणूस नेहमी तर्कशुद्ध निर्णय (rational choices) घेतो, तसे नसून behavioral economics हे दाखवते कि व्यवहारात पूर्वग्रह (biases), सवयी (habits) आणि साधी नियमपद्धती (heuristics) यामुळे अनेकदा अविवेकी निर्णय (irrational decisions) घेतले जातात.

वर सांगितलेल्या Heuristics चा अर्थ म्हणजे लोक जेव्हा सर्व माहिती खोलवर तपासून निर्णय घेत नाहीत, तेव्हा ते वापरत असलेले सोपे मानसिक शॉर्टकट (Mental shortcuts) होय. हे वेळ आणि प्रयत्न वाचवतात, पण कधी कधी चुकीचे निर्णय किंवा पूर्वग्रह निर्माण करतात. जसे कि लोक अनेकदा किंमत किंवा गुणवत्ता न पाहता प्रसिद्ध ब्रँडचा प्रॉडक्ट चांगला असेल असं गृहीत धरतात. ब्रँड = गुणवत्ता असा शॉर्टकट वापरतात (Representativeness Heuristic). जरी पुरावा नसेल तरी कोणती गोष्ट किंवा वस्तू वारंवार ऐकली की ती खरी आहे असं वाटणे. कारण वारंवार ऐकल्यामुळे गोष्ट पटकन आठवते आणि खरी वाटते (Availability Heuristic). बहुतेक लोक जिथे जातात तिथेच जाण्याचा निर्णय घेणे. जसे की गर्दी असलेले रेस्टॉरंट म्हणजे नक्की चांगलंच अन्न मिळतं असं समजणे (Social Proof Heuristic). लोक बहुतेक लोकांचा निर्णय बरोबर आहे असं गृहीत धरतात.

पारंपरिक अर्थशास्त्रात “Rational Economic Man” म्हणजेच माणूस नेहमी तर्कशुद्ध, सुसंगत आणि स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करणारे निर्णय घेतो. त्याच्याकडे पूर्ण माहिती (perfect information) असते, त्याला भावना, पूर्वग्रह किंवा चुकांची बाधा नसते, अशी कल्पना मानली जाते. पण थेलर दाखवून देतात की प्रत्यक्ष जीवनात लोक वारंवार “misbehave” म्हणजेच तर्कशुद्धतेच्या बाहेर वागतात. ते काम पुढे ढकलतात, तात्काळ मिळणाऱ्या फायद्याला जास्त महत्त्व देतात, डिफॉल्ट पर्याय बदलत नाहीत आणि अनेक वेळा अवास्तव निर्णय घेतात. हे निर्णय जरी Irrational (Illogical, Not based on reason, Emotion-driven) वाटले तरी ते पूर्णपणे अनियमित नसतात, तर ठराविक नमुन्यात आढळतात आणि त्यांचा अभ्यास करता येतो.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे थेलर यांची कथा सांगण्याची शैली. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची, डॅनियल काहनेमन Daniel Kahneman आणि अमोस ट्वर्स्की Amos Tversky यांसारख्या संशोधकांबरोबरच्या सहकार्याची आणि विविध प्रयोगांची रंजक कहाणी वाचकांसमोर मांडली आहे.

वाचकांसाठी अधिकची माहिती:

डॅनियल काह्नमन हे इस्रायली-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानसशास्त्र (Psychology) आणि अर्थशास्त्र (Economics) यांचा संगम घडवून आणत व्यवहार अर्थशास्त्र (Behavioral Economics) या नवीन क्षेत्राचा पाया घातला. लोक निर्णय घेताना त्यांच्या मनावर होणारे पूर्वग्रह (biases), ह्युरिस्टिक्स (heuristics) आणि तर्कशुद्धतेपासून होणाऱ्या चुकांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या संशोधनामुळे अर्थशास्त्रातील पारंपरिक “रॅशनल इकॉनॉमिक मॅन” ही संकल्पना अपुरी असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

अमोस टव्हर्स्की हे देखील इस्रायली मानसशास्त्रज्ञ होते आणि काह्नमन यांचे दीर्घकाळचे सहकारी होते. त्यांनी मिळून Prospect Theory मांडली, ज्यात दाखवून दिले की लोक जोखीम (risk) आणि नुकसान (loss) यांच्या बाबतीत अनेकदा तर्कशुद्ध निर्णय घेत नाहीत, तर भावनांनी व मानसिक सवयींनी प्रभावित होतात. या सिद्धांताने आधुनिक व्यवहार अर्थशास्त्राची दिशा बदलली. टव्हर्स्की यांचे निधन 1996 मध्ये झाले, त्यामुळे नोबेल पारितोषिक फक्त काह्नमन यांनाच मिळाले.


हर्बर्ट ए. सायमन (अर्थशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ) ह्यांनी “Bounded Rationality” (मर्यादित तर्कशुद्धता) ही संकल्पना मांडली. ह्यानुसार माणूस नेहमी पूर्णपणे तर्कशुद्ध निर्णय घेत नाही कारण त्याच्याकडे माहिती, वेळ आणि मेंदूची क्षमता मर्यादित असते. “Satisficing” ह्या त्यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार लोक नेहमी सर्वोत्तम पर्याय न निवडता “पुरेसा चांगला” पर्याय निवडतात. त्यांच्या कामामुळे त्यांना 1978 मध्ये decision-making process within economic organizations नोबेल पारितोषिक मिळाले..

Image of Daniel Kahneman, used under CC BY-SA 2.0 from Wikimedia Commons.

Misbehaving: The Making of Behavioral Economics मधील बिहेविअरल इकॉनॉमिक्सची उदाहरणे:

  1. Endowment Effect (मालकी हक्कामुळे वस्तूला जास्त किंमत देणे): विद्यार्थ्यांना फ्री मध्ये एक कप (mug) देण्यात आला. नंतर त्याच कपाला विकायला सांगितले तर त्यांनी जास्त किंमत मागितली. पण ज्यांच्याकडे कप नव्हता त्यांनी विकत घेण्यासाठी कमी किंमत द्यायला तयारी दाखवली. लोक वस्तू फक्त स्वतःच्या मालकीची आहे म्हणून तिला जास्त महत्त्व देतात.
  2. Mental Accounting: लोक पैशाला वेगवेगळ्या “खात्यांमध्ये” विभागतात. उदा. एखादा माणूस “सुट्टीसाठी ठेवलेले पैसे” उधळतो पण तेच पैसे “भविष्य बचत” मध्ये असतील तर वापरत नाही. वास्तविक पैसा एकच आहे, पण आपण त्याला वेगवेगळ्या डब्यांत ठेवतो. उदा. Tax Refund आल्यावर लोक तो उधळतात, पण पगारातून तेवढेच पैसे खर्च करायला तयार नसतात.
  3. Present Bias (तात्काळ समाधानाची इच्छा): लोक दीर्घकालीन फायद्यापेक्षा तात्काळ समाधानाला (Immediate Gratification) प्राधान्य देतात. उदा. भविष्यासाठी बचत करण्याऐवजी आज नवीन मोबाईल खरेदी करणे. लोक योग्य माहिती असूनही चुकीचे आर्थिक निर्णय का घेतात हे Present Bias स्पष्ट करते. लोक भविष्यातील मोठ्या फायद्यापेक्षा तात्काळ सुखाला प्राधान्य देतात. उदा. दीर्घकाळ आरोग्य चांगले ठेवण्याऐवजी आज गोड खाणे निवडणे.
  4. Fairness and Pricing: बर्फ पडलेल्या दिवशी हार्डवेअर दुकानाने फावड्यांची किंमत वाढवली. जरी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ते योग्य होते (जास्त मागणी = जास्त किंमत) तरी ग्राहकांनी ते “अन्याय्य” मानून संताप व्यक्त केला. लोक फक्त नफा-तोटा पाहून नव्हे तर “न्याय्यतेच्या (Fairness) भावनेवरून” ही निर्णय घेतात.
  5. Overconfidence in investing (गुंतवणुकीतील अति आत्मविश्वास): थेलर सांगतात की बरेच गुंतवणूकदार आपली क्षमता बाजारापेक्षा जास्त असल्याचे गृहीत धरतात. त्यामुळे ते अनावश्यक जोखीम घेतात, आणि तोटा होतो. गुंतवणूकदारांना वाटते की ते बाजारापेक्षा हुशार आहेत, त्यामुळे ते जास्त trading करतात. पण त्यांचे उत्पन्न साध्या Index Fund पेक्षा कमी मिळते.
  6. Lack of Self-Control (आत्मनियंत्रणाचा अभाव): बरेच लोक स्वतःलाच नियम घालतात, उदा. “क्रेडिट कार्ड घरी ठेवतो म्हणजे खर्च होणार नाही.” म्हणजेच लोकांना माहिती असते की ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत.
  7. Planner vs. Doer Problem (योजक विरुद्ध कृतीकर्ता समस्या): माणसात दोन व्यक्ती असतात: Planner (योजक) हा आपला तर्कशुद्ध, भविष्याकडे पाहणारा स्वभाव आहे. तो दीर्घकालीन फायद्याकडे लक्ष देतो जसे की बचत करणे, आरोग्य टिकवणे, अभ्यास करणे. Doer (करणारा/आकर्षणाकडे झुकणारा)- हा आपला भावनिक आणि तात्काळ सुख शोधणारा स्वभाव आहे. तो लगेच आनंद मिळवण्याकडे झुकतो. जरी त्यामुळे भविष्यात नुकसान झाले तरी तो तात्काळ सुख शोधतो. उदाहरणादाखल: Planner: “मी दर महिन्याला ₹5,000 निवृत्तीसाठी वाचवेन. Doer: “पण या महिन्यात मला नवीन मोबाईल घ्यायचाच आहे. मी पुढच्या महिन्यापासून बचत करीन.” Planner: “आरोग्यासाठी मी धूम्रपान सोडले पाहिजे.” Doer: “फक्त एक सिगारेटने काय बिघडणार आहे.”
  8. Status Quo Bias / Defaults (स्थिती तशीच ठेवण्याची प्रवृत्ती / डिफॉल्ट पर्याय): लोक आपोआप दिलेल्या पर्यायावर टिकून राहतात, जरी चांगले पर्याय उपलब्ध असले तरी. उदा. नोकरीतील कर्मचारी निवृत्ती बचतीसाठी दिलेल्या डिफॉल्ट टक्केवारीत बदल करत नाहीत.
  9. Loss Aversion (नुकसानीची भीती): लोकांना नफ्यापेक्षा नुकसान जास्त त्रासदायक वाटते. उदा. ₹1000 गमावल्याचा त्रास, ₹1000 मिळालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो.
  10. House Money Effect (जिंकलेल्या पैशाचे वेगळे वर्तन): जिंकलेले पैसे लोक जास्त धोक्यात घालतात. उदा. कॅसिनोमध्ये जिंकलेले पैसे लोक निर्धास्तपणे पुन्हा लावतात, पण स्वतःच्या बचतीतून नाही.

सारांश

Misbehaving: The Making of Behavioral Economics हे पुस्तक मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अद्वितीय संगम दर्शवणारे पुस्तक आहे. हे दाखवते की माणसांचे आर्थिक निर्णय केवळ तर्कशुद्ध नसून भावना, पूर्वग्रह आणि मानसिक शॉर्टकट्समुळे प्रभावित होतात. Richard H. Thaler यांनी behavioral economics च्या माध्यमातून वास्तविक जगातील बचत, खर्च, गुंतवणूक आणि धोरणनिर्मितीवर behaviorचा प्रभाव स्पष्ट केला आहे.
शेवटी, हे पुस्तक दाखवते की वर्तनशास्त्रीय दृष्टीकोन (behavioral perspective) स्वीकारल्यास व्यक्ती आणि समाजासाठी अधिक परिणामकारक आर्थिक निर्णय व प्रभावी धोरणं तयार करता येऊ शकतात.

माझ्या जुन्या वाचनातून शिकलेल्या काही नियमांवर ह्या पुस्तकातील संकल्पनांनी अजूनच खोल छाप उमटवली आणि काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपले Misbehaving काय? हे स्वतःलाच विचारा आणि त्याला दूर करण्यासाठी काम करा.

हे सुद्धा वाचा: मला भावलेला चार्ली मंगर

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *