|

The Timeless Wisdom of Charlie Munger

charlie munger

मला भावलेला चार्ली मंगर

माझ्याकडे असलेले Poor Charlie’s Almanack हे पुस्तक नुकतेच मी वाचनासाठी हाती घेतले आणि हे पुस्तक बरेच अगोदर वाचायला हवे होते असे मला वाटले. चार्ली मंगर ह्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू गुंतवणुकीच्या विषयातील एक खजिनाच असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

चार्ली मंगर – वॉरेन बफेचा दीर्घकाळचा व्यावसायिक जोडीदार आणि गुंतवणुकीच्या जगातील अदृश्य शक्ती. त्याच्या शांत स्वभावामागे लपलेली होती ती तीक्ष्ण बुद्धी, जी साध्या तत्त्वांवर अब्जावधींचं साम्राज्य उभारत होती. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी तो फक्त सल्लागार नव्हता, तर विचारसरणी बदलणारा मार्गदर्शक होता. त्याची गोष्ट म्हणजे पैशांपेक्षाही जास्त महत्वाची.

एकीकडे वॉरेन हा गुंतवणूक विश्वात सर्वात प्रशंसनीय आणि प्रसिद्ध आहे तर दुसरीकडे चार्लीने तुलनेने प्रकाशझोतात येणे टाळले पण पडद्यामागून आपल्या कामगिरीने त्याने बर्कशायर हॅथवे ला एक संपन्न कंपनी बनवण्यात आपला हातभार लावला.

Charlie Mungerजन्म : १ जानेवारी १९२४ रोजी ओमाहा, नेब्रास्का, (अमेरिका) मृत्यू: २८ नोव्हेंबर २०२३.

Poor Charlie’s Almanack ह्या Peter D. Kaufman ह्यांनी संपादित केलेल्या ह्या पुस्तकाला प्रस्तावना देतांना वॉरेन बफे लिहितात कि ‘सन १७३३ ते १७५८ या काळात बेन फ्रँकलिन यांनी “पुअर रिचर्ड्स अल्मनॅक”च्या माध्यमातून उपयोगी व शाश्वत सल्ला लोकांपर्यंत पोहोचवला. त्यात त्यांनी Thrift (काटकसर), Duty (कर्तव्यपरायणता), Hard work (कठोर परिश्रम) आणि Simplicity (साधेपणा) यासारख्या गुणांचं महत्त्व पटवून दिलं. पुढची दोन शतके या बाबतीतील विचारांमध्ये फ्रँकलिनचंच अंतिम वचन मानलं गेलं. पण मग चार्ली मंगर नावाचा माणूस पुढे आला.’

वाचकांसाठी अधिकची माहिती: पुअर रिचर्ड्स अल्मनॅक हे एक वार्षिक पंचांग होते, जे बेंजामिन फ्रँकलिन यांनी प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी “पुअर रिचर्ड” किंवा “रिचर्ड सॉंडर्स” हे टोपणनाव स्वीकारले होते. बेंजामिन फ्रँकलिन (१७ जानेवारी १७०६ – १७ एप्रिल १७९०) हे अमेरिकेतील एक बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ते शोधक, वैज्ञानिक, लेखक, मुद्रक, प्रकाशक, राजकारणी, मुत्सद्दी, तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात.

शेअर बाजाराचा संयमी सम्राट वॉरेन बफे ज्या व्यक्तीची अशी प्रशंसा करत असतील त्या चार्ली मंगर बद्दल अजून अधिक वाचण्याची मला घाई झाली. स्वतः काहीसा अल्पपरिचित राहण्यात समाधान मानणाऱ्या चार्ली मंगर यांना सर्वात जास्त ओळख मिळाली ती Berkshire Hathaway या अमेरिकी गुंतवणूक कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून. वॉरेन बफे्ट यांच्यासोबत त्यांनी दशकानुदशके भागीदारी केली. दोघांनी मिळून गुंतवणुकीची एक अद्वितीय वारसा निर्माण केला आहे. बफे्ट यांनी अनेकदा म्हटले आहे की – ‘चार्ली माझा सर्वात हुशार, प्रामाणिक व समजूतदार भागीदार आहे‘.

चार्ली मंगर यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष

मंगर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील वकील होते आणि आजोबा न्यायाधीश होते, त्यामुळे त्यांचे बालपण कायदा आणि शिस्त याच्या वातावरणात गेले. चार्ली आपल्या एका मुलाखतीत सांगतात कि त्यांचे आजोबा जरी पुढे न्यायाधीश झाले तरी त्यांचे (आजोबांचे ) लहानपण अतिशय दारिद्र्यात गेले. लहानपणी चार्ली ह्यांनी ओमाहातील बफे कुटुंबाच्या किराणा दुकानात काही दिवस काम केले होते. हे दुकान चालवणारे व्यक्ती वॉरेन बफे ह्यांचे आजोबा होते. शालेय जीवनात चार्ली गणितात अत्यंत हुशार होते आणि पुस्तक वाचनाची त्यांना आवड होती.

चार्ली मंगर हे नंतरच्या काळात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून जगभर ओळखले गेले, पण त्यांच्या तरुणपणीचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींचा सामना केला. मिशिगन विद्यापीठात गणित शिकत असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्यांनी शिक्षण सोडून अमेरिकन सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. यू.एस. आर्मी एअर कॉर्प्स मध्ये हवामानशास्त्राचे प्रशिक्षण घेत असताना त्यांना स्थिर भविष्याची हमी नव्हती.

शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी त्यांना युद्धानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. वकिली सुरू केल्यानंतर सुरुवातीला फारसे पैसे मिळत नसल्याने ते काटकसर करून राहत. वकिली करत असताना त्यांना गुंतवणूक क्षेत्राची आवड निर्माण झाली, पण हा बदल सुरक्षित नव्हता. त्यांनी स्थिर वकिलीचा व्यवसाय सोडून अनिश्चित पण संभाव्यतेने समृद्ध असलेल्या गुंतवणूक व्यवसायात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांच्याकडे मोठे भांडवल नव्हते, त्यामुळे त्यांनी छोट्या प्रमाणात भागीदारी सुरू केली आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली.

चार्ली मंगर यांच्या या संघर्षकाळातून दिसते की त्यांची चिकाटी, दीर्घकालीन विचारसरणी आणि अपयशातून शिकण्याची क्षमता हीच त्यांना नंतर वॉरेन बफे यांचे निकटचे सहकारी आणि एक महान गुंतवणूकदार बनवणारी ठरली.

चार्ली मंगर आणि वॉरेन बफे यांची पहिली भेट व गुंतवणुकीची वाटचाल

चार्ली मंगर आणि वॉरेन बफे यांची पहिली भेट १९५९ मध्ये ओमाहा (Nebraska) येथे झाली. पहिल्याच भेटीत बफे आणि मंगर यांची विचारसरणी जुळली. दोघांनाही दीर्घकालीन गुंतवणूक, व्यवसाय विश्लेषण आणि शिस्तबद्ध निर्णय घेणे यामध्ये खोलवर रस होता.
बफे यांनी नंतर म्हटले की, “त्या दिवशी मी चार्लीला भेटलो आणि ठरवलं हा माणूस माझ्यासोबत काम करायलाच हवा.” बफेच्या नातेवाईकांनी म्हटले कि “आम्ही आज पहिल्यांदा बफेला कुणाचे तरी ऐकतांना बघितले अन्यथा फक्त बफे बोलतो आणि इतर ऐकतात.”

भेटीनंतर काही वर्षे दोघे स्वतंत्रपणे गुंतवणूक करत राहिले. चार्ली मंगर यांनी स्वतःची गुंतवणूक भागीदारी (Investment Partnership) चालवली आणि उल्लेखनीय परतावा मिळवला. वॉरेन बफे Buffett Partnership Ltd. द्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला बफे यांनी मंगरला Berkshire Hathaway मध्ये सामील होण्याचे सुचवले आणि मंगर Berkshire Hathaway चे उपाध्यक्ष झाले.
बफे यांच्या buying good companies at reasonable low prices ह्या तत्त्वज्ञानात मंगरने बदल घडवून आणला. त्यांनी सुचवले की:”थोड्याशा अधिक किंमतीला उत्कृष्ट कंपनी विकत घेणे, स्वस्तात साधारण कंपनी विकत घेण्यापेक्षा चांगले.” (It is better to buy an excellent company at a slightly higher price than to buy an average company at a cheap price.)

चार्ली मंगर ह्यांचे गुंतवणूक तत्वज्ञान आणि यशस्वी गुंतवणुकीची उदाहरणे

  • दीर्घकालीन दृष्टी: कंपन्यांमध्ये दशकेभरासाठी गुंतवणूक करणे.
  • उत्कृष्ट व्यवस्थापनावर विश्वास: चांगले व्यवसाय फक्त चांगल्या लोकांकडेच वाढतात.
  • साधेपणा: गुंतवणूक करताना अति गुंतागुंतीचे मॉडेल्स टाळणे.
  • धीर: योग्य संधी मिळेपर्यंत वाट पाहणे.
  • Coca-Cola – १९८८ मध्ये Berkshire ने केलेली गुंतवणूक आजही लाभदायक ठरली.
  • See’s Candies – मंगरच्या सल्ल्याने घेतलेली ही खरेदी Berkshire साठी “ब्रँड व्हॅल्यू” चे उत्तम उदाहरण ठरली.
  • BNSF Railway, Apple Inc., GEICO यांसारख्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक.
charlie munger

मंगर ने मात्र एका मुलाखतीत सांगितले कि आम्ही See’s candies ह्या कंपनीला विकत घेणार नव्हतो पण आमच्या एका सहकारी मित्राने म्हटले कि जर तुम्ही ही गुंतवणूक केली नाही तर एका मोठ्या फायद्याला तुम्ही मुकणार. मग त्याच्या आग्रहामुळे वॉरेन आणि चार्ली ह्यांनी परत ह्या कंपनीचा अभ्यास केला.
बफे आणि मंगर यांचे संबंध फक्त व्यावसायिक नव्हते, ते घनिष्ठ मित्र होते. दोघेही एकमेकांच्या विचारांचा आदर करत आणि चुकांवर स्पष्टपणे चर्चा करत.बफे यांनी मंगरबद्दल म्हटले: “चार्लीने मला एक चांगला गुंतवणूकदार आणि त्याहून अधिक चांगला माणूस बनवलं.”

मला स्वतःला ह्या दोघांच्या मुलाखती आवडतात कि ज्यात त्यांचे हजरजबाबीपणा आणि मिश्किल हास्याचे दर्शन घडते. विलक्षण ज्ञानाचा साठा असलेली ही जोडगोळी आपल्या वागण्या बोलण्यातून साधेपणाचे अप्रतिम दर्शन घडवून देतात. रसिक वाचक अशा मुलाखतीचे व्हिडिओ इंटरनेटवर शोधू शकतात.

चार्लीच्या मुलाखतीत तर हास्याच्या अनेक घटना घडत. चार्ली आपल्या विनोदी वृत्तीने गंभीर गोष्टीवर सुद्धा असे काही भाष्य करायचा कि मुलाखत घेणारा व दर्शक दोघेही मनमुराद हसायचे. एकदा एका मुलाखतकाराने चार्लीला विचारले कि वॉरेन तुमच्यापेक्षा श्रीमंत का आहे? त्यावर चार्ली लगेच उत्तरला कि वॉरेनने लवकर सुरुवात केली. मग त्याने मुलाखतकाराला प्रश्न विचारला कि माझ्यापेक्षा आईन्स्टाईन गरीब का होता? ह्यावर सगळेच हसत सुटले.

एकदा एकाने त्यांना विचारले कि तुम्ही वकिलीचा पर्याय का निवडला? त्यावर चार्ली उत्तरला, “माझे आजोबा व वडील वकील होते, त्यामुळे मला जास्त काही करायची गरज नव्हती (हास्य). सोपं सांगायचं तर मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, कारण त्यात तेच ते काम होते (हास्य ). मला मोठ्या संस्थेच्या तळापासून सुरुवात करून हळूहळू वर जायचं नव्हतं. मी स्वभावाने थोडा विरोधी विचारांचा आहे, त्यामुळे ते माझ्यासाठी जमलं नसतं. आणखी एक म्हणजे, जेव्हा मला वाटायचं की कुणी मुर्खासारखे बोलतंय, तेव्हा मी त्यांना तसं सांगायचो आणि मोठ्या संस्थेत वर जाण्यासाठी ही पद्धत चालत नाही. त्यामुळे तेही माझ्यासाठी शक्य नव्हतं (प्रचंड हास्य ). मग उरला तो पर्याय कायदा. मला माझे वडील आणि आजोबा खूप आवडायचे, त्यांचं आयुष्य चांगलं गेलं होतं, त्यामुळे मी नैसर्गिकरित्या त्या दिशेने वळलो. माझ्या मते आजही बरेच लोक ह्याच कारणाने लॉ स्कूलला जातात त्यांच्या आवडी-क्षमता बघता, हा सर्वात कमी वाईट पर्याय असतो (हास्य ). आजकाल काही लोक बिझनेस स्कूलला जातात, जे माझ्या काळात लॉ स्कूलला गेले असते. माझ्या मते, इथे असलेले अनेकजण बिझनेस स्कूलला जातील, कारण तो त्यांच्यासाठी “सर्वात कमी वाईट” पर्याय आहे (हास्य ).” Charlie अशा पद्धतीने प्रेक्षकांना आणि मुलाखतकाराला खिळवून ठेवत असे.

मंगर स्वतःच्या मानसिक पूर्वग्रहांबाबत (mental biases) जागरूक आहेत. ते सांगतात की, प्रत्येक गुंतवणूकदाराने आपले mental biases ओळखणे अत्यावश्यक आहे. मंगर यांच्या मते, अतिशय बुद्धिमान व्यक्तीदेखील मानवी मानसशास्त्रामुळे होणाऱ्या निर्णयातील चुकांपासून पूर्णपणे मुक्त नसतात. या चुका अनेकदा नकळत घडतात आणि चुकीच्या गुंतवणूक निर्णयांना कारणीभूत ठरतात. आपल्या mental biases ची जाणीव ठेवून, गुंतवणूकदार अधिक तर्कसंगत, वस्तुनिष्ठ आणि शिस्तबद्ध निर्णय (more rational, objective, and disciplined choices) घेऊ शकतात.

मानसिक पूर्वग्रह (mental biases) विषयी मंगर यांचे महत्त्वाचे मुद्दे

  1. स्वतःबद्दल जागरूक राहणे आवश्यक: तुम्ही, इतरांप्रमाणेच, पूर्वग्रहांना बळी पडू शकता हे मान्य केले पाहिजे. हे न मानल्यास टाळता येणाऱ्या चुका घडू शकतात. You must admit that you, like everyone else, are prone to bias. Ignoring this fact increases the chance of making avoidable mistakes.
  2. मानसिक सापळे (“psychological misjudgments”): These include overconfidence, confirmation bias, social proof, loss aversion, anchoring, and many others. (ह्यातील Loss Aversion बद्दल Stocks to Riches ह्या लेखात लिहिलेले आहे.)
  3. तपासणी सूची (checklist) उपयुक्त ठरते: निर्णय घेण्यापूर्वी सामान्य संज्ञानात्मक चुका (common cognitive errors) लक्षात ठेवण्यासाठी मंगर नेहमी तपासणी सूची वापरण्याचा सल्ला देतात.
  4. विविध विषयांचे ज्ञान मिळवा: मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, गणित इत्यादींचे अध्ययन केल्याने स्वतःच्या व इतरांच्या चुकीच्या विचारप्रक्रिया ओळखण्यासाठी साधने मिळतात. चार्ली मंगर यांचे एक मुख्य तत्त्व म्हणजे बहुविषयक (Multidisciplinary) विचारसरणीचा अवलंब. त्यांचे मत आहे की केवळ एकाच विषयातील ज्ञान पुरेसे नसते; निर्णय अधिक चांगले घेण्यासाठी Economics, Psychology, Mathematics, Physics, Biology, History अशा विविध शाखांतून Mental Models तयार करावेत.

सतत शिकण्याचे महत्त्व

मंगर आणि बफेट हे दोघेही ‘लर्निंग मशीन’ मानले जातात. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय सतत वाचन आणि शिक्षण घेण्याला दिले आहे. ते भरपूर वेळ वाचनात घालवतात. चार्ली लिहितो, “अखंड वाचनाद्वारे आजीवन स्वयं-अभ्यासक बना; जिज्ञासा जोपासा आणि दररोज थोडे अधिक शहाणे होण्यासाठी प्रयत्न करा.” (Develop into a lifelong self-learner through voracious reading; cultivate curiosity and strive to become a little wiser every day.) चार्ली म्हणतो, “Go to bed smarter than when you woke up.” ज्ञानाची Compounding ही तितकीच महत्त्वाची आहे जितकी पैशांची. ह्या Compounding वर Compound effect ह्या पुस्तकाची समीक्षा आपण इथे वाचू शकता. मला आवडलेले हे एक फारच परिणामकारक पुस्तक आहे.

चार्ली म्हणतो, “माझ्या संपूर्ण आयुष्यात, (विस्तृत विषयांच्या क्षेत्रात) मी एकही शहाणा माणूस पाहिलेला नाही जो सतत वाचन करत नसेल – एकही नाही, शून्य.” परत तो म्हणतो, “तुम्हाला वॉरेन किती वाचतो आणि मी किती वाचतो हे पाहून आश्चर्य वाटेल.” (In my whole life, I have known no wise people (over a broad subject matter
area) who didn’t read all the time-none, zero. You’d be amazed at how much
Warren reads-and at how much I read.)

मंगर यांच्या मते,

  • ‘जे माहिती आहे, त्यावरच ठाम राहा’. अनोळखी गोष्टींत उडी घेण्याऐवजी, माहितीच्या आधारावर निर्णय घ्या. गुंतवणूक ‘सोपे (Simple) आहे, पण सहज (Easy) नाही’ – हे बफेट यांचे वाक्य इथे सार्थ ठरते.
  • यशस्वी गुंतवणूक ही वास्तवाधारित दृष्टिकोन, संयम आणि योग्य वेळी धाडस यांच्या तत्त्वांवर आधारलेली असते. समभाग विकत घेताना, तुम्ही त्या व्यवसायात भागीदार होत आहात हे लक्षात ठेवा. फक्त ट्रेंड्स पाहून निर्णय घेऊ नका. कंपनीचे मूल्यमापन करा, व्यवसायातील मूलभूत बाबी समजून घ्या, आणि योग्य किंमतीची वाट बघा.
  • भावनिक गुंतवणुकीला टाळा. अति आशावाद, मत्सर किंवा भीती यांच्या प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. त्याऐवजी, बाजारी चढ-उतारांना संधी म्हणून बघा.
  • यासाठी एक चेकलिस्ट तयार करा आणि निर्णय प्रक्रियेला टप्प्याटप्प्याने सोपं करा. या पद्धतीने तुमचे विचार अधिक तार्किक राहतील.

मंगर यांचे यशस्वी होण्याचे सूत्र

मंगर यांचे यश कोणत्याही गूढ गोष्टीमुळे नाही, तर त्यांच्या कठोर शिस्तीच्या, सातत्याने शिकण्याच्या आणि सरळसोप्या पद्धतीवर आधारित आहे. त्यांनी कोणतीही नविन प्रणाली निर्माण केली नाही, फक्त आयुष्याच्या तत्त्वांना गुंतवणुकीत प्रामाणिकपणे वापरले. हे आपण सर्वही करू शकतो – गरज आहे फक्त जाणीवपूर्वक कृतीची, आणि ज्ञान व धाडस यांच्या मिश्रणाची.

मंगर यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर –
“तुम्हाला जे हवं आहे, ते मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही त्यासाठी पात्र असायला हवं. To get what you want, you must first deserve what you want.”
“खूप हुशार होण्याचा प्रयत्न न करता, फक्त मूर्खपणापासून दूर राहिलात, तरीही तुम्ही पुढे जाल.”

Inversion Thinking म्हणजे समस्येकडे मागच्या बाजूने पाहणे. “यश कसे मिळवायचे?” याऐवजी “अपयश कसे टाळायचे?” असा विचार करा. गुंतवणुकीत, आरोग्यात, नात्यांत – हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो.

“Invest only within your Circle of Competence.”
म्हणजे, जे तुम्हाला नीट समजते, त्यातच गुंतवणूक करा. ट्रेंड किंवा भावनांवर आधारित निर्णय हे नुकसानच करतात.

Patience, Discipline & Long-Term View: मंगर Long-Term Investing चे समर्थक आहेत. ते म्हणतात, “Buy great businesses at fair prices and hold them.” त्यांना Frequent Trading अजिबात पसंत नाही. गुंतवणूक ही केवळ नफा कमवण्याचा मार्ग नाही, तर Integrity, Character, Reliability यांचे प्रतिबिंब असावे.

Poor Charlie’s Almanack हे फक्त गुंतवणुकीचं पुस्तक नाही, तर शहाणपण आणि विचारशील जगण्याचा मार्गदर्शक आहे. मंगर यांचे यश नैसर्गिक नाही, ते शिस्तबद्ध, विचारपूर्वक, आणि मूल्यांवर आधारित जीवन जगल्यामुळे मिळाले.
चार्ली मंगर हे गुंतवणुकीच्या क्षेत्रात आदर्श, आणि विचारांच्या क्षेत्रात दीपस्तंभ आहेत. त्यांची शिकवण आपल्याला केवळ चांगले गुंतवणूकदारच नव्हे, तर चांगले माणूस होण्यासाठी प्रेरित करते.

तुम्हाला चार्ली मंगरचे कोणते विचार आवडलेत ह्यावर अवश्य प्रतिक्रिया द्या.

हे सुद्धा वाचा: The Compound Effect: Jumpstart Your Income, Your Life, Your Success मराठी समीक्षा

Similar Posts

One Comment

  1. जीवनात बदल घडवायचा असेल तर प्रथम आपल्यातील त्रुटी जाणणं गरजेचं आहे. चार्ली मंगर यांचे विचार आत्मसात केल्यास यशस्वी आणि समृद्ध जीवन जगणं नक्कीच शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *