The Law of Diminishing Marginal Utility

Law of Diminishing Marginal Utility-An Economic Rule We Live Every Day
आपले दैनंदिन जीवन आणि अर्थशास्त्र
आपल्याला वाटते की अर्थशास्त्र म्हणजे फक्त बाजारपेठ, मोठमोठे व्यवहार किंवा आकडेवारी. पण खरे पाहता अर्थशास्त्र प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दडलेले आहे. आपण नेहमी करत असलेल्या खरेदीमागे मागणी व पुरवठा (Demand & Supply) यांचा खेळ असतो. एखादी वस्तू बाजारात कमी उपलब्ध झाली की तिची किंमत वाढते, आणि जास्त प्रमाणात आली की किंमत कमी होते. हे सर्व आपण दररोज अनुभवत असतो, फक्त आपण त्याला ‘अर्थशास्त्र’ म्हणून ओळखत नाही.
अर्थशास्त्र केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या प्रत्येक निर्णयाशी जोडलेले आहे. पगार मिळाल्यावर आपण किती पैसे खर्च करायचे, किती बचत करायची आणि किती गुंतवणूक करायची हे ठरवताना आपण नकळत अर्थशास्त्राचेच नियम पाळतो. चित्रपटाला जायचे की नवीन कपडे घ्यायचे हा निर्णयसुद्धा आपण खर्च आणि समाधानाचा तुलनात्मक विचार करूनच घेतो. म्हणूनच अर्थशास्त्र हे फक्त अभ्यासाचे विषय नसून, आपले दैनंदिन जीवन सोपे व सुयोग्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.
अर्थशास्त्राला अजून सोपे करून घेण्यासाठी अर्थशास्रातील काही प्रसिद्ध आर्थिक नियमांची ओळख करून घेऊया.
- मागणीचा नियम (Law of Demand): एखाद्या वस्तूचा दर कमी झाला तर तिची मागणी वाढते आणि दर वाढला तर मागणी कमी होते (इतर घटक स्थिर असतील तर). उदाहरण: आंब्यांचे दर उन्हाळ्यात कमी झाले तर लोक जास्त आंबे खरेदी करतात.
- पुरवठ्याचा नियम (Law of Supply): वस्तूचा दर वाढला तर तिचा पुरवठा वाढतो आणि दर कमी झाला तर पुरवठा कमी होतो (इतर घटक स्थिर असतील तर). उदाहरण: गव्हाचा बाजारभाव जास्त असेल तर शेतकरी अधिक गहू विकायला तयार होतात.
- Law of Diminishing Marginal Utility: एखाद्या वस्तूचे वारंवार सेवन केल्यास प्रत्येक पुढील एककापासून मिळणारा आनंद किंवा समाधान कमी होत जातो. उदाहरण: समजा तुम्ही आंबा खात आहात. पहिला आंबा खूपच चविष्ट वाटतो (उपयुक्तता जास्त). दुसरा आंबा थोडा कमी आनंद देतो. तिसरा आंबा अजून कमी समाधान देतो. प्रत्येक अतिरिक्त आंब्याने मिळणारे समाधान म्हणजेच सीमांत उपयुक्तता (Marginal utility).
एकदा कुठेतरी वाचनात आल्याने Law of Diminishing Marginal Utility ह्या नियमाने माझे लक्ष वेधले गेले. ही Marginal Utility आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. हर्मन हेनरिक गॉसन (Hermann Heinrich Gossen) या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने Law of Marginal Utility हा नियम सर्वप्रथम मांडला. त्याला गॉसनचा पहिला नियम असेही म्हटले जाते.
H.H. Gossen ने आपल्या “The Laws of Human Relations” (1854) या पुस्तकात मांडले कि एखादी वस्तू सतत अधिकाधिक प्रमाणात घेतल्यास प्रत्येक अतिरिक्त युनिटचे उपयोजन कमी होत जाते. पहिल्या युनिटमुळे जास्त समाधान मिळते, पण नंतरचे युनिट्स घेतल्यावर समाधान हळूहळू घटते. (When a person keeps consuming more units of the same good, the pleasure (utility) from each successive unit decreases) एखाद्या टप्प्यानंतर उपयोजन शून्य होऊ शकते आणि त्यानंतर निगेटिव्ह (अपायकारक) देखील होऊ शकते.
हा नियम ग्राहक वर्तनाचा नैसर्गिक नियम मानला जातो. ह्यालाच गॉसनचा पहिला नियम (Gossen’s First Law) असे म्हणतात. “जितकं जास्त प्रमाणात मिळतं, तितका प्रत्येक अतिरिक्त युनिटचा आनंद कमी होत जातो.” म्हणून माणूस विविध वस्तूंवर खर्च करतो, एका वस्तूवर सगळं खर्च करत नाही. कारण अर्थशास्त्रज्ञांनी पाहिलं की प्रत्यक्ष जीवनात सीमांत उपयुक्तता बहुतेक वेळा कमी होत जाते. ती स्थिर राहत नाही, उलट प्रत्येक अतिरिक्त युनिटनंतर ती घसरतच जाते. म्हणूनच या नियमात सतत घटण्याची प्रवृत्ती दाखवण्यासाठी ह्रास (Diminishing) हा शब्द जोडला आहे.
आता वर सांगितल्याप्रमाणे, पहिला आंबा खूप चविष्ट वाटतो, समाधान जास्त मिळतं. दुसरा आंबा चविष्ट वाटतो, पण पहिल्यापेक्षा समाधान कमी मिळतं. तिसरा आंबा समाधान अजून कमी. म्हणजेच “ह्रास” (Diminishing) शब्द दाखवतो की प्रत्येक अतिरिक्त आंब्यातून मिळणारा आनंद कमी कमी होत जातो. नवीन मोबाईल घेतल्यावर पहिल्या काही दिवसात खूप आनंद होतो; पण महिनाभरात तोच मोबाईल नेहमीसारखा वाटू लागतो. हा नियम फक्त खरेदीपुरता मर्यादित नाही. तो मनोरंजन, प्रवास आणि अगदी गुंतवणूक यामध्येही लागू होतो.

अर्थशास्त्रज्ञ काय सांगतात?
DMU हा सार्वत्रिक कल आहे, पण तो नेहमी ““इतर सर्व गोष्टी जशाच्या तशा राहिल्यास” किंवा “बाकीच्या परिस्थितीत बदल न झाल्यास.”” लागू होतो. प्रत्यक्ष आयुष्यात मानसशास्त्र, संस्कृती आणि परिस्थिती या घटकांमुळे तो किती प्रमाणात लागू होईल हे बदलू शकतं.
“हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा नियम कठोर नसून एक मार्गदर्शक तत्त्व आहे. तो प्रामुख्याने ग्राहकांची मागणी समजावण्यासाठी उपयोगात आणला जातो. काही अपवाद आढळले तरी त्यामुळे हा नियम चुकीचा ठरत नाही; उलट ते मानवी वर्तन अधिक गुंतागुंतीचं आहे हे स्पष्ट करतात. म्हणजेच, एखाद्या वस्तूचा एक अतिरिक्त युनिट वापरल्यानंतर मिळणारं समाधान कधी जास्त, कधी कमी, कधी स्थिर, तर कधी नकारात्मकही असू शकतं.”
आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया कि काय ह्या नियमाचा उपयोग व्यवसायात कसा वापरला जात असावा?
- विविधता (Variety) देणे: एकाच वस्तूचं सतत सेवन केल्याने उपयोजन (समाधान , एखादी वस्तू/सेवा घेतल्यावर मिळालेलं सुख) कमी होतं. म्हणून कंपन्या नवीन चव, रंग, आकार बाजारात आणत असाव्यात. उदा.: थंड पेयाच्या कंपन्या आपल्या बाटल्या वेगवेगळ्या फ्लेवर्स व वेगवेगळ्या आकारात उपलब्ध करतात.
- कॉम्बो पॅक / बंडलिंग: एकाच वस्तूऐवजी मिश्रण देऊन ग्राहकाचं समाधान टिकवून ठेवतात. उदा.: बर्गर + फ्रेंच फ्राइज + थंड पेय. जर फक्त ३ बर्गर खाल्ले तर MU पटकन कमी होईल, पण कॉम्बोने समाधान वाढते. (हे मला अगोदर माहित नव्हते पण संयोगाने मी बरेचदा असे Combo pack घेत नसायचो.)
- सवलत योजना (Discounts): जशी अतिरिक्त युनिटची MU कमी होते , तसं ग्राहक त्या वस्तूला त्याच किंमतीला पुन्हा विकत घेत नाही. म्हणून “Buy 1 Get 1 Free” किंवा “दुसऱ्या वस्तूवर ५०% सूट” अशा ऑफर्स दिल्या जातात.
- वेगवेगळ्या आकाराचे पॅकिंग: कंपन्या ग्राहकाला वेगवेगळ्या आकाराचे पॅकिंग निवडण्याचा पर्याय देतात, जेणेकरून उपयोजन ((समाधान , एखादी वस्तू/सेवा घेतल्यावर मिळालेलं सुख)) कमी झाल्यास तो वेगळ्या आकाराचे पॅक घेईल. उदा.: चिप्स ₹१०, ₹२०, ₹५० च्या पॅकमध्ये.
- क्रॉस-सेलिंग आणि अप-सेलिंग: एक वस्तू खरेदी केल्यानंतर तिचं उपयोजन कमी होतं, तेव्हा विक्रेते संबंधित वस्तू सुचवतात. उदा.: मोबाईल घेतल्यावर कवर, इयरफोन सुचवले जातात. (मी जेव्हा पुस्तके खरेदी करतो तेव्हा असे बरेच पर्याय समोर येतात पण इथे सुद्धा संयोगाने किंवा विचारांती लेखक (मी) फक्त आपल्याला हवे असलेले पुस्तकच खरेदी करत असतो. हे असे असते हे सुद्धा मला ह्या नियमाचा जास्त खोलात अभ्यास केल्यावरच समजले.)
- सीझनल / लिमिटेड एडिशन: कंटाळा येऊ नये म्हणून कंपन्या नवीन फ्लेवर, रंग, डिझाईन किंवा सीझनल प्रॉडक्ट्स बाजारात आणतात.उदा.: उन्हाळ्यात आइसक्रीम कंपन्या मँगो फ्लेवर आणतात. Limited Edition मध्ये काही जास्तीचे features देऊन ग्राहकाला अशी लिमिटेड वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असावे. (इथे मला दाक्षिणात्य सिनेमात नायकाच्या Entry सोबत दाखवत असलेली Limited Edition Car आठवते.)
सोप्या भाषेत:
सीमांत उपयोजन घटण्याचा नियम सांगतो: “एखादीच वस्तू जास्त प्रमाणात घेतल्यावर तिचं समाधान कमी होतं.” त्यामुळे व्यवसाय विविधता, सवलत, कॉम्बो आणि नवीन अनुभव देऊन ग्राहकाला पुन्हा खरेदीस प्रवृत्त करतात. लेखकाला अपेक्षा आहे कि आता आपल्याला सुद्धा अशा काही खरेदी आठवल्या असतीलच
सारांश
ह्या लेखाचा सारांश काय असावा ह्याचा वाचकांनी आपल्या परीने शोध घ्यावा. माझ्या लेखणीनुसार असे म्हणता येईल कि , अर्थशास्त्र फक्त आकडे मोजण्याचं शास्त्र नाही, तर मानवी भावना आणि समाधान कसं बदलतं याचंही शास्त्र आहे. हाच धडा आपल्याला दैनंदिन जीवनातही शिकायला मिळत असावा कि अती वस्तू जमवल्या तर कदाचित त्या वेळेनुरूप आकर्षण गमावतील. समाधान हे फक्त “जास्तीत जास्त” मिळवण्यात नसून “योग्य प्रमाणात” आनंद घेण्यात आहे.
म्हणूनच, सीमांत उपयुक्तता (Marginal Utility)आणि त्यातील ह्रासाचा नियम (The Law of Diminishing Marginal Utility) आपल्याला जीवनाचा साधा पण मोठा मंत्र देतात – “काहीही मोजून घ्या, पण त्यात आनंद शोधा!”
Very informative